केंद्र सरकारनं २०२५ सालच्या हंगामासाठी सुक्या खोबऱ्याला प्रतिक्विंटल १२ हजार १०० रुपये इतका हमीभाव निश्चित केला आहे. आर्थिक व्यवहार विषयक केंद्रीय मंत्रिमंडळ समितीनं काल मंजुरी दिली. सुक्या खोबऱ्याच्या किसाकरता दर्जानुसार प्रति क्विंटल ११ हजार पाचशे ब्याऐंशी रुपये इतका, आणि गोटा खोबऱ्यासाठी प्रति क्विंटल १२ हजार १०० रुपये इतका हमीभाव जाहीर झाला आहे. २०१४ च्या तुलनेत हमीभावात सुक्या खोबऱ्याच्या किसाकरता १२१ टक्के, तर गोटा खोबऱ्यासाठी १२० टक्के वाढ झाली असल्याचं सरकारनं म्हटलं आहे.
सर्व अनिवार्य पिकांकरिता उत्पादन खर्चाच्या किमान दीडपट इतकी किमान आधारभूत किंमत निश्चित केली जाईल अशी घोषणा केंद्र सरकारनं २०१८ – १९ सालच्या केंद्रीय अर्थसंकल्पात केली होती. त्यानुसार ही वाढ केली असल्याचंही सरकारनं म्हटलं आहे.
किमान आधारभूत किंमत योजनेअंतर्गत सुक्या खोबऱ्याच्या खरेदीकरता नाफेड अर्थात, राष्ट्रीय कृषी सहकारी पणन महासंघ आणि आणि राष्ट्रीय सहकारी ग्राहक महासंघ या संस्था मध्यवर्ती संस्था म्हणून कार्यरत राहतील असंही सरकारनं स्पष्ट केलं आहे.
Site Admin | December 21, 2024 4:36 PM | dry coconut