विधानपरिषदेत अर्थसंकल्पावरची चर्चा आज सुरु झाली. राज्याच्या तिजोरीत खडखडाट असताना निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केवळ स्वतःचा अजेंडा राबवण्यासाठी सरकारनं अर्थसंकल्पाचा वापर केला आहे अशी टीका विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली. राज्याची आर्थिक स्थिती ,उत्पन्न आणि तूट यांचा ताळमेळ न राखता या अर्थसंकल्पात केवळ घोषणांच केल्या आहेत, मात्र प्रत्यक्षात त्याचा जनतेला लाभ होणार नाही, असं ते म्हणाले.
राज्यावर कर्जाचा डोंगर असून कृषी आणि उद्योग क्षेत्राकडे सरकारचं पूर्णपणे दुर्लक्ष झालं आहे, असं सांगून ते म्हणाले, जनतेशी संबंधित असलेल्या सर्व विभागांना सर्वात कमी तरतूद या अर्थसंकल्पात आहे. गेल्या अर्थसंकल्पातल्या योजनांची अंमलबजावणी झालेली नाही, असं त्यांनी नमूद केलं.