संत शिरोमणी सावता महाराज यांची जन्मभूमी आणि कर्मभूमी असलेल्या श्री क्षेत्र अरण तीर्थक्षेत्र विकासासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीनं सविस्तर आराखडा तयार केला जात आहे. या तीर्थक्षेत्राच्या सर्वांगीण विकासाच्या आराखड्यासाठीचा १०० कोटींचा पहिला हप्ता आपण आज मंजूर करत असून या तीर्थक्षेत्राला ‘अ’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा देणार असल्याची ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी दिली. श्रीक्षेत्र अरण तालुका माढा इथल्या श्री संत शिरोमणी सावता महाराज भक्त परिवार मेळावा आणि भक्तनिवास वास्तुशिल्प भूमिपूजन कार्यक्रमानंतर फडनवीस बोलत होते. यावेळी अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, यांच्यासह अनेक आमदार तसंच सावता महाराज यांचे भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुण्याच्या भिडे वाड्यासंदर्भातली केस राज्य शासनानं जिंकली असून या वाड्याच्या सर्वांगीण विकासाचा आराखडा तयार केला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते तिथल्या कामाचं भूमिपूजन लवकरच केलं जाईल, अशी माहितीही फडनवीस यांनी यावेळी दिली.