वैद्यकीय प्रवेश परीक्षा – नीट मधल्या गैरप्रकारांविषयी चर्चेची मागणी करत विरोधी पक्षसदस्यांनी गदारोळ केल्यामुळे, आज लोकसभेचं कामकाज तहकूब करण्यात आलं. संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलेल्या अभिभाषणाबद्दल आभार प्रस्तावावर आज चर्चा होणार होती. मात्र लोकसभेत आजच्या दिवसाचं कामकाज सुरु होताच वैद्यकीय प्रवेश परीक्षा-नीट प्रकरणी चर्चा करण्याची मागणी विरोधकांनी केली. सभापती ओम बिर्ला यांनी ती अमान्य केल्यानं विरोधकांनी निषेधाच्या घोषणा दिल्या. गदारोळामुळे सभागृहाचं कामकाज आधी दुपारी बारा वाजेपर्यंत आणि नंतर दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं.
राज्यसभेतही या मुद्यावर चर्चा करण्याची मागणी विरोधकांनी केली, त्यावर अधिवेशन काळात या मुद्द्यावर विस्तृत चर्चा करता येईल, असं राज्यसभेचे अध्यक्ष जगदीप धनखड यांनी सांगितलं. त्यावर विरोधकांनी गदारोळ केल्यानं कामकाज एका तासासाठी तहकूब करण्यात आलं. त्यानंतर कामकाज पुन्हा सुरु झाल्यानंतर राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरच्या आभार प्रस्तावावर चर्चा सुरु झाली.आज दोन्ही सभागृहांमध्ये दिवंगत सदस्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.