देशाच्या स्वातंत्र्यासाठी, राजकीय पार्श्वभूमी नसतानाही अनेकांनी स्वातंत्र्यलढ्यात स्वतःला झोकून दिलं, विकसित भारताचं लक्ष्य साध्य करण्यासाठी आज अशाच भावनेची गरज आहे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.
प्रधानमंत्र्यांनी आज आकाशवाणीवरून मन की बात या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशवासियांशी संवाद साधला. हा या कार्यक्रमाचा ११३वा भाग होता.
आज मोठ्य़ा संख्येनं युवा राजकारणात यायला तयार आहेत, त्यांना केवळ योग्य मार्गदर्शन आणि योग्य संधीची गरज आहे असं त्यांनी सांगितलं. युवा वर्गान या अभियानात स्वतःला जोडून घ्यावं असं आवाहन करतानाच, युवांचं हे पाऊल देशाचं भविष्य़ बदलवून टाकणारं ठरेल असं ते म्हणाले.
यंदाच्या स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर राबवल्या गेलेल्या हर घर तिरंगा अभियान मोठ्या प्रमाणात यशस्वी झाल्याचं त्यांनी सांगितलं. या निमित्तानं देशभरात अभिनव पद्धतीनं काढलेल्या तिरंगा यात्रांची माहिती त्यांनी श्रोत्यांना दिली. जेव्हा लोक एकत्र येऊन आपल्या भावना प्रकट करतात तेव्हा अशा प्रकारची अभियानं प्रचंड यशस्वी होतात असं ते म्हणाले. स्वातंत्र्य दिन आता एक सामाजिक पर्व झालं असून, या अभियानामुळे ई कॉमर्स मंचावर तिरंग्याच्या रंगाच्या सामानाची विक्री वाढत असल्याचं निरीक्षण त्यांनी आज मन की बात मध्ये नोंदवलं. या अभियानामुळे स्वातंत्र्य दिनाला देशाच्या प्रत्येक कोपऱ्यात जमीन, पाणी आणि आकाशातही आपल्या राष्ट्रीय ध्वजाचे रंग दिसले, या अभियानानं संपूर्ण देशाला एका सूत्रानं बांधलं असून, हाच एक भारत श्रेष्ठ भारत आहे असं ते म्हणाले.
आजच्या मन की बात मधून प्रधानमंत्र्यांनी प्राणी तसंच पर्यावरण संवर्धन आणि रक्षणासाठी देशाभरात सुरु असलेल्या काही अभिनव प्रयत्नांची, आणि अशा प्रयत्नांत योगदान देत असलेल्या तंत्रज्ञानाधारीत स्टार्ट अप्सची उदाहरणं श्रोत्यांसमोर मांडली. या क्षेत्रात अधिकाधिक स्टार्ट अप्स येऊ लागले तर त्यामुळे पशुप्राण्यांच्या संरक्षणासोबतच, परंपराही टिकून राहतील असं ते म्हणाले. देशातली अनेक स्टार्टअप्स पर्यावरणाला चालना देण्याचं काम करत असल्याबद्दल त्यांनी आनंदही व्यक्त केला. आपण सर्वानी मिळून प्रयत्न केले तर पर्यावरणाचं रक्षण होईल आणि देशही पुढे जाईल असं ते म्हणाले.
आपल कुटुंब, समाज आणि आपला देशाचं भवितव्य आजच्या लहान मुलांवर अवलंबून आहे, त्यामुळेच या मुलांच्या मुलांचं पोषण ही देशाची प्राथमिकता असल्याचं ते म्हणाले. यादृष्टीनं मुलांच्या योग्य पोषण आहार मिळावा म्हणून सरकारच्या वतीनं राबवल्या जात असलेल्या धोरणात्मक उपाययोजनांची माहिती त्यांनी श्रोत्यांना दिली आणि प्रत्येकानं आपल्या क्षेत्रातल्या पोषणविषयक जागरूकता अभियानांशी जोडून घेण्याचं आवाहन त्यांनी केलं. प्रत्येकाच्या लहानशा प्रयत्नानं कुपोषणा विरोधातल्या लढ्याला मोठं बळ मिळेल असं ते म्हणाले.
नुकताच २३ ऑगस्टला देशानं पहिला राष्ट्रीय अंतराळ दिन साजरा केल्याचं सांगताना, त्यांनी मागच्या वर्षी याच दिवशी भारताचं चांद्रयान तीन चंद्राच्या दक्षिण भागात शिव – शक्ती पॉइंट इथं यशस्वीपणं उतरल्याच्या कामगिरीला उजाळा दिला. यानिमीत्तानं त्यांनी अंतराळ तंत्रज्ञान क्षेत्रातल्या गॅलेक्स आय या स्टार्ट अपच्या चमूशीही संवाद साधला. २१ व्या शतकातल्या देशातल्या घडामोडींमुळे विकसित भारताचा पाया मजबूत होत असल्याचं ते यावेळी म्हणाले.
संस्कृत भाषा संवर्धनासाठी देशासह परदेशात होत असलेल्या प्रयत्नांचा उल्लेख त्यांनी केला, आणि संस्कृतला प्रोत्साहन देण्यासाठीचे प्रयत्न सुरु ठेवण्याचं आवाहन त्यांनी केलं.
लवकरच पॅरिसमध्ये होणार असलेल्या पॅरालिम्पिक स्पर्धेत देशाचं प्रतिनिधीत्व करत असलेल्या आपल्या दिव्यांग खेळाडूंना चिअर फॉर भारत हा हॅश टॅग वापरून प्रोत्साहन द्यावं असं आवाहनही त्यांनी नागरिकांना केलं.
एक पेड मा के नाम या अभियानाची आठवण करून देत, प्रत्येकानं जास्तीत जास्त झाडं लावण्याचं – त्यासाठी इतरांना प्रोत्साहन देण्याचं, तसंच नागरिकांनी पावसाळ्यात स्वतःची काळजी घेण्यासोबतच जलसंवर्धनांच्या मोहिमांमध्येही सहभागी होण्याचं आवाहनही त्यांनी आजच्या मन की बात मधून केलं.
येत्या काही दिवसात साजऱ्या होणाऱ्या जन्माष्टमी, गणेशोत्सव, ओणम, मिलाद उन नबी या सणांसह तेलुगू भाषा दिनाच्या शुभेच्छा त्यांनी नागरिकांना दिल्या.