हमदर्द या कंपनीच्या रुह आफजा या शितपेयाला शरबत जिहाद म्हणणाऱ्या चित्रफिती समाजमाध्यमावरून काढून टाकण्याचं पतंजली उद्योग समूहाचे संस्थापक रामदेव बाबा यांनी दिल्ली उच्च न्यायालयासमोर मान्य केलं आहे.
हमदर्द कंपनीने या चित्रफितींच्या विरोधात दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणी न्यायमूर्ती अमित बन्सल यांच्या पीठासमोर झाली. रुह आफजा शरबतावरून धार्मिक विद्वेष पसरवणारी वक्तव्यं केल्याबद्दल न्यायमूर्ती बन्सल यांनी रामदेव यांना फटकारलं तसंच हे कृत्य अक्षम्य असल्याचं सांगितलं. भविष्यात अशी वक्तव्यं, जाहिराती, समाजमाध्यमावर पोस्ट करणार नाही असं प्रतिज्ञापत्र सादर करायला न्यायालयानं रामदेव यांना सांगितलं आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी १ मे रोजी होणार आहे.