हिंगोलीत संकटमोचन हनुमान मंदिरापासून भव्य शोभायात्रा काढण्यात आली. लहान मुलांनी श्रीराम, लक्ष्मण, सीता, हनुमान यांचा देखावा केला होता. नागपुरातही उत्साहाचं वातावरण असून पोद्दारेश्वर राम मंदिरात विविध पूजा अर्चना केल्या जात आहेत. अकोला शहरात राजेश्वर मंदिर परिसरापासून बाईक रॅली काढण्यात आली. शिर्डी इथं कालपासून सुरू झालेल्या रामनवमी उत्सवाच्या मुख्य दिवशी आज अखंड पारायण समाप्तीनंतर श्रींचे फोटो, पोथी आणि वीणा यांची मिरवणूक काढण्यात आली.
श्री साईबाबा समाधी शताब्दी स्तंभाच्या ध्वजाचं विधीवत पूजन करुन ध्वज बदलण्यात आला. या निमित्तानं राज्यातल्या विविध भाविकांच्या पायी दिंड्या शिर्डीमध्ये दाखल झाल्या असून शिर्डी भाविकांनी फुलून गेली आहे. संतनगरी शेगाव मध्येही हजारो वारकऱ्यांच्या दिंड्या दाखल झाल्या आहेत. दुपारी पालखी सोहळा आणि नगरपरिक्रमा होणार आहेत