महाराष्ट्रात यंदाच्या खरीप हंगामात आतापर्यंत विक्रमी 71 टक्के पेरणी झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत 1 लाख 10 हजार हेक्टरची वाढ झाल्याची माहिती राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी काल विधानसभेत दिली. आतापर्यंत 101 लाख हेक्टरवर पेरणी झाली आहे. गेल्या वर्षीच्या 3 जुलैच्या तुलनेत हे प्रमाण 20 लाख हेक्टरनं वाढलं आहे, असं त्यांनी सांगितलं. राज्यात कुठेही खतं आणि बियाणांचा तुटवडा नाही. नियोजनापेक्षा अधिक खतं आणि बियाणं उपलब्ध आहेत, असं ते म्हणाले.
राज्यातल्या दिवाळखोर सहकारी पतसंस्था आणि बँकांनी बुडवलेल्या ठेवीदारांचे किमान एक लाख रुपये परत मिळण्यासाठी स्वतंत्र निधी उभारला जात आहे, अशी माहिती सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी काल विधानसभेत दिली. आक्षेपार्ह शब्द वापरल्याप्रकरणी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचं पाच दिवसांसाठी केलेलं निलंबन तीन दिवसांवर आणण्याचा प्रस्ताव विधानपरिषदेनं काल एकमतानं मंजूर केला. संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांनी हा प्रस्ताव मांडला. तो आवाजी मतदानाने मंजूर करण्यात आला.