डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

August 4, 2024 7:05 PM

printer

राज्याच्या अनेक ठिकाणी धरणातल्या पाण्याचा विसर्ग

मुंबईसह राज्यभरात आज पावसाचा जोर असून अनेक ठिकाणी धरणांमधला विसर्ग वाढवल्यामुळे नद्यांकाठच्या गावांमधल्या नागरिकांना प्रशासनानं सावधानतेचा इशारा दिला आहे. पुणे जिल्ह्यात खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदी पात्रामध्ये सुरू असणारा विसर्ग वाढवून आजपासून ३५ हजार २ क्युसेक इतका केला आहे. पानशेत, वरसगाव आणि टेमघर या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात, तसंच मावळ, मुळशी, वेल्हे आणि जुन्नर या तालुक्यांमध्ये मुसळधार पाऊस सुरु आहे. त्या परिसरातल्या धरणांमधूनही मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरु आहे. पुणे जिल्ह्यातून कोकणात जाणारे अनेक घाटरस्ते बंद केले आहेत. पवना, इंद्रायणी आणि मुळा या नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. नदीकाठी बचाव कार्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवली असून तात्काळ मदतीसाठी राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाला शहरात पाचारण केलं आहे. उजनी धरण ९० टक्क्यांहून अधिक भरलं असून सोलापूर जिल्ह्यातही भीमा नदीकाठच्या गावांना सर्तकतेचा इशारा दिला आहे. 

धुळे जिल्ह्यातल्या पांझरा नदीच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे तसंच पांझरा, मालनगाव आणि जामखेडी प्रकल्पातून पाण्याचा येवा वाढल्यानं अक्कलपाडा धरणामध्ये पाण्याच्या साठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यामुळे निम्न पांझरा मध्यम प्रकल्पातून आज दुपारी ३ हजार ५०० क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला. पाण्याची आवक बघता येत्या काही तासांत विसर्ग वाढण्याची शक्यता असल्यानं पांझरा नदी काठच्या नागरिकांनी खबरदारी घ्यावी असं आवाहन धुळे मध्यम प्रकल्पाच्या कार्यकारी अभियंत्यांनी केलं आहे. 

नाशिक शहरासह जिल्ह्यात पावसाची संततधार सुरूच असून गंगापूर धरणातून दुपारी चार वाजता ४ हजार क्युसेक विसर्ग वाढवला असून सायंकाळी तो सहा हजार क्युसेक इतका करण्यात येणार आहे. दारणा धरणात, भावली, पालखेड या धरणांमधून विसर्ग सुरू असून जिल्ह्यातल्या 

सर्वच धरणांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. त्र्यंबकेश्वर इथं गावात आणि मंदिरात पाणी शिरलं आहे तर भाम धरणात पाण्याच्या विसर्गामुळे काकु्स्ते गावात घरांमध्ये पाणी शिरलं आहे. या गावातल्या २२ कुटुंबांना अन्यत्र स्थलांतरीत केलं आहे. दरम्यान गोदावरी नदीला आलेल्या पुरात नाशिक शहरात रामकुंडाजवळ एक अभियंता पुराच्या पाण्यात वाहून गेला. अग्नीशमन दलाच्या जवानांनी शोध घेऊनही तो सापडू शकला नाही. 

अहमदनगर जिल्ह्यात भंडारदरा आणि निळवंडे पाणलोट क्षेत्रात जोरदार पावसामुळे धरणांमधल्या पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. भंडारदरा धरणातून २७ हजार क्युसेक वेगानं तर निळवंडे धरणातून ७ हजार क्युसेक वेगानं पाणी सोडलं जात आहे. यंदा पहिल्यांदाच नगर जिल्ह्यातल्या  धरणांमधून जायकवाडी धरणाकडे पाणी सोडलं जात आहे, त्यामुळे येत्या काळात विसर्गात वाढ होण्याची शक्यता आहे. 

पालघर जिल्ह्यात आज सकाळपासून पावसाची रिपरिप सुरु आहे. सततच्या पावसामुळे जिल्ह्यातल्या वैतरणा, पिंजाळ या नद्या दुथडी भरून वाहत असून या नद्यांनी आपली इशारा पातळी ओलांडली आहे. तर धामणी धरण, वांद्री, मोडकसागर, तानसा, मध्य वैतरणा धरण, कवडास बंधारा इत्यादी धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरु आहे. 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा