राज्याचा बहुतांश भाग नैर्ऋत्य मोसमी पावसानं व्यापला असून अनेक ठिकाणी पावसानं हजेरी लावली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या २४ तासांत अनेक ठिकाणी १०० मिलिमीटरहून अधिक पावसाची नोंद झाली. खेड तालुक्यातल्या जगबुडी नदीनं इशारा पातळी ओलांडली आहे.
ठाणे शहरात काल रात्री सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडला. यामुळे शहरात अनेक ठिकाणी वृक्ष उन्मळून पडले. गावंडबाग भागात वाऱ्यामुळे उडून आलेला लोखंडी पत्रा फूटबॉल टर्फवर कोसळला. त्यात १५ ते १६ वयोगटातली सहा मुले जखमी झाली. त्यांना उपचारासाठी नजिकच्या खासगी रुग्णालयात दाखल केलं आहे. कोल्हापूर जिल्ह्यातही कालपासून जोरदार पाऊस सुरू आहे. अकोल्यात रात्री ३ च्या सुमाराला पावसानं हजेरी लावली.
दक्षिण कोकण आणि मध्य महाराष्ट्रातल्या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर मराठवाडा आणि विदर्भातल्या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा आणि मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.