पुरोगामी महाराष्ट्राची परंपरा अबाधित राखतानाच राज्य शासन कुठल्याही समाज घटकावर अन्याय होऊ देणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. मुंबईत काल आरक्षणाबाबत सर्वपक्षीय बैठक मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झाली, त्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते. आरक्षणाबाबत राजकीय पक्षांनी आपली लेखी भूमिका, अभिप्राय शासनाला कळवावेत, असं आवाहन त्यांनी यावेळी केलं.
राज्यात मराठा, ओबीसी समाजाच्या आरक्षणाबाबत चर्चेतून मार्ग निघाला पाहिजे. कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखली जातानाच जातीय सलोखा देखील कायम राहीला पाहिजे अशी भुमिका मुख्यमंत्र्यांनी यावेळी मांडली. मराठा समाजाला टिकणारं आरक्षण देतानाच अन्य समाज घटकांवर अन्याय होऊ देणार नाही, असा पुनरुच्चार त्यांनी केला. गॅझेटच्या तपासणीसाठी हैदराबाद इथं ११ जणांचं पथक पाठवण्यात आल्याचंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, राज्य मंत्रिमंडळातले इतर सदस्य, खासदार अशोक चव्हाण, सुनील तटकरे, वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यावेळी उपस्थित होते.