गेल्या १० वर्षात योगाभ्यासाची व्याप्ती वाढली असून योग पर्यटनाविषयीचं आकर्षण वाढल्यामुळे लोक भारतात त्याचं शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेण्यासाठी येतात, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं. आंतरराष्ट्रीय योग दिनाचा मुख्य समारंभ आज जम्मू काश्मीरमध्ये श्रीनगर इथं शेर ए काश्मीर आंतरराष्ट्रीय परिषद केंद्रात झाला. त्यावेळी ते बोलत होते.
शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक वाढीसाठी योगाच्या महत्त्वावर त्यांनी भर दिला. याेगाची उपयुक्तता जगभरातल्या लोकांना समजल्यामुळे योगाभ्यास करणाऱ्यांची संख्या वाढली आहे असंही ते म्हणाले. तुर्कमेनिस्तान, सौदी अरेबिया अशा अनेक देशातल्या शैक्षणिक संस्थांमधे योगशास्त्राचा समावेश अभ्यासक्रमात केल्याची माहिती त्यांनी दिली. सध्या योग हा संशोधनाचा विषय झाल्याचं त्यांनी सांगितलं. यावेळी नायब राज्यपाल मनोज सिन्हा, केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव आणि इतर मान्यवर उपस्थित होते.