अवकाळी पावसामुळे शेतीचं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना १५ जुलैपर्यंत मदत देऊ, असं आश्वासन सरकारने आज विधानसभेत दिलं. महाराष्ट्र विधिमंडळाचं अधिवेशन आज दुसऱ्या दिवशी प्रश्नोत्तराच्या तासाने सुरू झालं. यावेळी विरोधी पक्षाच्या सदस्यांंनी विचारलेल्या प्रश्नला उत्तर देताना सरकारने ही माहिती दिली. अवकाळी पावसामुळे राज्यातल्या दोन लाख ९१ हजार हेक्टरहून अधिक शेतीचं नुकसान झाल्याची माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी दिली. शेतकऱ्यांना नेमकी किती मदत मिळणार हे जाहीर करावं, अशी मागणी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली. त्यावर उपग्रहाद्वारे पाहणी करण्याऱ्या NDVI अर्थात नॉर्मलाईझ डिफरन्स व्हेजिटेशन इंडेक्सनुसार मदतीचे निकष ठरतात. त्यानुसार जिल्हाधिकारी करतील तेवढा निधी मंजूर करू असं आश्वासन पाटील यांनी दिलं.
महानंद डेअरी NDDB अर्थात नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डाला चालवायला दिली तरी महानंद ब्रँड कायम राहणार आहे, पाच वर्षात डेअरी नफ्यात आली तर सरकार ती पुन्हा चालवायला घेईल, असं दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितलं. ९ लाख लिटर दुधाची क्षमता असलेल्या महानंदमध्ये केवळ ६४ हजार लिटर दुधावर प्रक्रिया होत असल्याची माहिती त्यांनी दिली.
कुठल्याही पबमध्ये वय न तपासता प्रवेश दिला तर पबचा परवाना रद्द केला जाईल, तसंच गुन्हा दाखल केला जाईल अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्षवेधी सूचनेवर चर्चा करताना दिली. आमदार सुनील प्रभु यांनी ही लक्षवेधी उपस्थित केली होती. अटींचे उल्लंघन केलेल्या पुण्यातल्या ७० पबचे परवाने रद्द केल्याची माहिती फडणवीस यांनी दिली. तर अंमली पदार्थांच्या वापरामुळे पुण्याची अप्रतिष्ठा होत असल्यामुळे पोलिस आयुक्तांच्या राजीनाम्याची मागणी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली. पण, आयुक्तांनी कार्यक्षमतेने कारवाई केल्याचं सांगत फडणवीस यांनी ही मागणी फेटाळली. तसंच याप्रकरणी कोणत्याही मंत्र्याने पोलिसांवर दबाव आणलेला नाही. स्थानिक आमदारांनी याप्रकरणी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला होता, असं फडणवीस म्हणाले.
तत्पूर्वी, अधिवेशनाच्या सुरुवातीला शिवसेनेचे भरत गोगावले, संजय गायकवाड यांच्यासह इतर आमदारांनी विधान भवनाच्या पायऱ्यांवर सरकारच्या समर्थनात घोषणाबाजी केली. याला प्रत्युत्तर म्हणून विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, आमदार रवींद्र धंगेकर, जितेंद्र आव्हाड यांनी सरकारविरोधात घोषणाबाजी केली.
दरम्यान, आज दुपारी दोन वाजता राज्याचा अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार विधानसभेत मांडतील