राज्यात शांतता नांदावी यादृष्टीनं, मराठा-ओबीसी वादावर तोडगा काढण्यासाठी आपण प्रयत्न करू असं ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सांगितलं आहे. पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते आज बोलत होते. या समुदायांमधला वाद मिटवण्यासाठी पुढाकार घेण्याची विनंती, मंत्री छगन भुजबळ यांनी शरद पवार यांना भेटून केली, त्या पार्श्वभूमीवर पवार बोलत होते. हा वाद निर्माण होण्यासाठी सत्ताधारीच जबाबदार असल्याचा आरोप पवार यांनी केला.
मराठा समुदायाचे मनोज जरांगे आणि ओबीसी समाजातर्फे आंदोलन करणारे लक्ष्मण हाके यांच्याशी सरकारच्या प्रतिनिधींची चर्चा झाली असून आपल्याला त्याचा तपशील माहीत नाही, असं ते म्हणाले. त्याच करणानं, आरक्षणासंबंधी सरकारनं बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीला आपण गेलो नव्हतो असं त्यांनी स्पष्ट केलं. या चर्चेचा तपशील समजल्यास परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी काही प्रयत्न करता येईल अशी प्रतिक्रीया पवार यांनी व्यक्त केली.