मराठवााड्यात काल अनेक ठिकाणी मेघगर्जनेसह जोरदार पाऊस झाला.
बीड जिल्ह्यातल्या पाटोदा महसूल मंडळात काल मध्यरात्री पासून मुसळधार पाऊस पडत असून मांजरा नदीला महापूर आला आहे. पाटोदा, पारगाव, अनपटवाडी या नदीकाठच्या गावांना महापुराचा मोठा फटका बसला असून शेकडो एकर जमिनीवरची पिकं पाण्याखाली गेली असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
हिंगोली जिल्ह्यातल्या तीसपैकी नऊ मंडळात गेल्या २४ तासात अतिवृष्टीची नोंद झाली असून, काल पहाटे मेघगर्जनेसह झालेल्या जोरदार पावसामुळं हिंगोली शहरालगत असलेल्या कयाधू नदीला पूर आला आहे.
लातूर जिल्ह्यातही काल मुसळधार पाऊस झाला. जळकोट तालुक्यात झालेल्या जोरदार पावसामुळे शेती पिकांचं मोठं नुकसान झालं तर चाकूरसह तालुक्यातल्या महाळंगी परिसरात नागरिकांच्या घरात पाणी घुसल्यानं संसारोपयोगी साहित्य आणि शेतीपिकांचं मोठं नुकसान झालं आहे.
छत्रपती संभाजीनगरसह जालना जिल्ह्यातही आज पहाटेपासून ढगाळ वातावरण असून संततधार पाऊस सुरु आहे.