देशाला जगातली तिसरी अर्थव्यवस्था बनवण्याच्या दृष्टीनं शेतीचा विकास हा अत्यंत महत्त्वाचा असून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करण्याला आपण प्राधान्य दिल पाहिजे, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज वाराणसी मधल्या मेहेंदीगंज इथं केलं. प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा १७ वा हप्ता आज शेतकऱ्यांच्या बँक खात्यात प्रधानमंत्र्यांनी जमा केला, यानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या उपक्रमांतर्गत २० हजार कोटींहून अधिक रुपये ९ कोटी २६ लाख लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत.
३० हजार स्वयं सहायता गटांच्या महिलांना कृषी सखी प्रमाणपत्रांचं वाटप यावेळी करण्यात आलं. महिलांना नव्या अर्थार्जनाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी आणि ३ कोटींपेक्षा अधिक लखपती दीदी बनवण्यासाठी शासन प्रयत्न करणार आहे. कृषी सखी ही योजना सध्या १२ राज्यात सुरु असून ती सर्व राज्यांमधे राबवण्याचं उद्दिष्ट आहे. महिलांच्या सहभागाशिवाय शेतीचा विकास होणं अशक्य आहे, असं प्रधानमंत्र्यांनी सांगितलं.