राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारचा विकास आराखडा हा समाजातील वंचित घटकांना प्राधान्य देण्याचा आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. आपलं सरकार अनेक दशकांपासून, दुर्लक्षित असलेल्यांना प्राधान्य देत असल्याचं त्यांनी सांगितलं. काल मुंबईत २९ हजार ४०० कोटी रुपयांच्या विविध रस्ते आणि रेल्वे प्रकल्पांचं उद्घाटन, लोकार्पण आणि पायाभरणी केल्यानंतर उपस्थितांशी संवाद साधताना पंतप्रधान बोलत होते. या प्रकल्पांमध्ये ठाणे-बोरिवली बोगदा, गोरेगाव-मुलुंड लिंक रोड, कल्याण यार्डचं रीमॉडेलिंग आणि नवी मुंबईतील तुर्भे इथलं गती शक्ती मल्टी मॉडेल कार्गो टर्मिनल यांचा समावेश आहे.
मुंबईत सुरू करण्यात आलेले विकास प्रकल्प सर्वदूर संपर्क वाढवतील, शहराच्या पायाभूत सुविधांमध्ये लक्षणीय सुधारणा करतील आणि त्याचा इथल्या नागरिकांना मोठा फायदा होईल”, असं पंतप्रधान म्हणाले. महाराष्ट्र राज्य, विकासाचा नवा अध्याय लिहित असून मुंबईकरांचं जीवनमान सुधारण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत; असंही पंतप्रधानांनी सांगितलं. संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गाची कामं लवकरच पूर्ण होतील, अशी ग्वाही पंतप्रधानांनी दिली.
पंतप्रधानांनी महाराष्ट्रात पूर्ण झालेल्या आणि सुरू असलेल्या विविध विकास प्रकल्पांचा उल्लेख केला. तर विरोधकांचा समाचार घेताना – खोट्या बातम्या पसरवणारे लोक देशाचे शत्रू असून नागरिक हा खोटा प्रचार नाकारत असल्याचं त्यांनी सांगितलं. तरुणांना संधी उपलब्ध करून देणाऱ्या महाराष्ट्र सरकारच्या ‘मुख्यमंत्री युवा उमेदवारी’ योजनेची सुरुवात मोदी यांनी यावेळी केली.
पायाभूत सुविधांच्या विकासात मैलाचा दगड ठरणाऱ्या लोकमान्य टिळक टर्मिनस इथल्या नव्या फलाटाचं आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथल्या विस्तारित फलाट क्रमांक १० आणि ११ चं लोकार्पण मोदी यांनी केलं. यावेळी महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार, केंद्रीय मंत्री पियुष गोयल, रामदास आठवले आणि इतर मान्यवर उपस्थित होते.