राज्यात आजही अनेक भागात पावसाची संततधार सुरु आहे. मुंबई ठाण्यासह उपनगरात सकाळपासून पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या.
मुंबईत दादर आणि प्रभादेवी रेल्वे स्थानकांदरम्यान झाड पडल्यामुळं पश्चिम रेल्वेची सेवा काही काळ विस्कळीत झाली, मात्र ती लगेचच पूर्ववत झाली.
पालघर जिल्ह्यातही मुसळधार पावसामुळे अनेक नद्यांना पूर आल्याची स्थिती आहे. भिवंडीत बाजारपेठ, तीन बत्ती, कल्याण नाका या परिसरात गुडघाभर पाणी साचलं.
रायगड जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळित झालं. जिल्ह्यातल्या उल्हास नदी, सावित्री नदी, अंबा नदी, कुंडलिका या नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली, तर अंबा नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौक, बाजारपेठ, मरिआई मंदिर परिसर, कोळी वाडा परिसरात पुराचं पाणी शिरलं. त्यामुळे शहराला जोडणारे तिन्ही रस्ते बंद झाले. एसटी स्थानकातही पुराचे पाणी शिरल्यानं वाहतूक बाधित झाली.
जगबुडी नदीला पूर आल्यामुळे खेड शहरातल्या १७७ जणांना स्थलांतरित करण्यात आलं. अतिवृष्टीमुळे खेड आणि संगमेश्वरात अनेक भागात पाणी साचल्यानं वाहतूक ठप्प झाली.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात तळवडे न्हावणकोंड धबधब्याकडे जाणाऱ्या मार्गावर दरड कोसळल्यानं हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. जिल्ह्यातली तेरेखोल आणि गड नदी इशारा पातळीवर वाहत आहे. होडावडा- कळसूली इथल्या पुलावर तसंच किर्लोस इथल्या बंधाऱ्यावर पाणी साचल्यामुळे इथली वाहतूक बंद ठेवण्यात आली.
दरम्यान हवामान विभागानं रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे.
कोल्हापूरमध्ये सतत पडत असलेल्या पावसामुळं जिल्ह्यातल्या नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली. शाहूवाडी तालुक्यात बर्की रस्त्यावर एक फुट पाणी साचल्यानं हा आल्यानं हा रस्ता वाहतुकीसाठी बंद केला होता.
पुण्यात पिंपरी चिंचवडला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणाच्या पाणी पातळीत ३ पूर्णांक ९४ टक्क्यांची वाढ झाली आहे. पुण्यातल्या मुकुंदनगर भागात मोठं झाड, विजेच्या खांबावर कोसळल्यानं विद्युत खांब कोसळला.