पद्मश्री दया पवार स्मृति पुरस्कार या वर्षी आशालता कांबळे, शाहू पाटोळे, सुकन्या शांता आणि अरुणा सबाने यांना जाहीर झाला आहे. येत्या रविवारी मुंबईत हे पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत.
प्राध्यापक आशालता कांबळे या फुले-आंबेडकरी चळवळीतील एक तत्त्वनिष्ठ कार्यकर्त्या तसंच संविधान मूल्यांचं साहित्य लिहिणाऱ्या लेखिका म्हणून परिचित आहेत.
पुरस्काराचे दुसरी मानकरी शाहू पाटोळे यांनी दलितांच्या खाद्य इतिहासाबाबत ‘अन्न हे अपूर्णब्रह्म’ हे पुस्तक लिहिलं असून हे पुस्तक इंग्रजीतही प्रकाशित झालं आहे. पाटोळे हे भारतीय माहिती सेवेतील निवृत्त अधिकारी असून त्यांनी आकाशवाणी आणि दूरदर्शनसारख्या संस्थांमध्ये काम केलं आहे.
पुरस्काराच्या तिसऱ्या मानकरी सुकन्या शांता यांनी विविध राज्यांमधल्या तुरुंगात होणाऱ्या जातीआधारित भेदभावावर संशोधन करून सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. त्यावर राज्यांच्या तुरुंग नियमावलीतून कैद्यांना जातीवर आधारित कामाचं वाटप करण्याची पद्धत रद्द करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं नुकतेच दिले आहेत.
यंदाच्या ‘बलुतं’ पुरस्कारासाठी विदर्भातल्या ज्येष्ठ लेखिका अरुणा सबाने यांची निवड करण्यात आली आहे. ‘सूर्य गिळणारी मी’ या आत्मकथनासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे.