पथ कर वसुलीसाठी ग्लोबल नेव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टीम प्रभावी, व्यवहार्य आणि पर्यावरणाच्या दृष्टीने महत्त्वाची भूमिका बजावेल असं रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीत या संदर्भातल्या एका आंतरराष्ट्रीय कार्यशाळेला संबोधित करताना ते बोलत होते. पथकर भरण्याचं नैतिक आणि आर्थिक महत्त्व विशद करताना ते म्हणाले की दर्जेदार सेवांच्या माध्यमातून प्रणालीमध्ये समतोल राखण्याची गरज आहे. एका मजबूत व्यवस्थेसाठी वर्तन बदलासोबतच एकात्मिक दृष्टीकोन आवश्यक आहे यावर गडकरी यांनी भर दिला. पथकर वसुली सुरळीत ठेवण्यासाठी कार मालकांसाठी मासिक पास तयार करण्याची सूचना केली. कायदे न पाळण्याच्या प्रवृत्तींबद्दल गडकरी यांनी चिंता व्यक्त केली. पारदर्शक, आणि प्रभावी टोल प्रणालीची अपेक्षा व्यक्त करून त्यांनी या व्यवस्थेतील त्रुटी दूर करण्याची गरज अधोरेखित केली.