केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्गमंत्री नीतीन गडकरी यांनी काल जम्मू आणि काश्मीरमधील रस्ते आणि महामार्ग प्रकल्पाच्या कामांचा आढावा घेण्यासाठी श्रीनगर इथं राजभवनमध्ये स्वतंत्र बैठक घेतली. यावेळी या भागात अत्यंत खर्चीक अशी पायाभूत सुविधा उभारणीची आणि रस्ते प्रकल्पांची कामं सुरू केल्याबद्दल जम्मू आणि काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गडकरी यांचे आभार मानले. आम्ही जम्मू आणि काश्मीरच्या मजबूत आणि उज्ज्वल भवितव्यासाठी अत्यंत समर्पित भावनेनं काम करीत आहोत. या नव्या प्रकल्पामुळे या परिसरात रोजगाराच्या नव्या संधी निर्माण झाल्या असून प्रदेशाच्या अर्थव्यवस्थेलाही हातभार लावला आहे, असं सिन्हा म्हणाले. गडकरी यांनी यावेळी परिसरात सुरू असलेल्या महत्त्वाच्या सहा रस्ते प्रकल्पाचा आढावा घेतला.त्याबाबत अधिकाऱ्यांना आवश्यक सूचनाही दिल्या.