वैद्यकीय आणि दंत वैद्यकीय प्रवेशासाठीच्या नीट परीक्षेत पेपरफुटी आणि अन्य गैरप्रकार झाल्याचा आरोप करत त्याची केंद्रीय अन्वेषण संस्थेमार्फत चौकशी करण्याची मागणी करणाऱ्या विविध याचिकांवर सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रीय परीक्षा संस्था तसंच केंद्र सरकारला नोटिसा बजावल्या आहेत. न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि न्यायमूर्ती संदीप महेता यांच्या सुट्टीकालीन पीठाने सीबीआय आणि बिहार राज्यसरकारकडूनही जबाब मागितला असून त्याकरता दोन आठवड्यांची मुदत दिली आहे. नीट परीक्षेत पेपरफुटीचा आरोप करत त्याची सीबीआय चौकशी करण्याची मागणी करणाऱ्या याचिका देशातल्या विविध उच्च न्यायालयांमधे दाखल झाल्या आहेत. त्यांची एकत्रित सुनावणी घ्यावी अशी विनंती राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं केली होती. त्यावर न्यायालयाने याचिकाकर्त्यांना आपलं म्हणणं मांडायला सांगितलं आहे. पुढची सुनावणी येत्या ८ जुलैला होणार आहे.
Site Admin | June 14, 2024 2:54 PM | NEET examination | notice | Supreme Court