नांदेड जिल्ह्यातल्या भोकर, अर्धापूर, मुदखेड तालुक्यासह जिल्ह्यातल्या सर्वच जल जीवन मिशन अंतर्गत सुरु असणाऱ्या पाणी पुरवठा योजनांची कामं जलद गतीनं करावीत, तसंच या योजनांच्या कामांचा सद्यस्थितीचा अहवाल तातडीनं सादर करावा असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिले. मंत्रालयातल्या समिती कक्षात नियोजन विभाग, वित्त विभाग तसंच पाणीपुरवठा आणि स्वच्छता विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत त्यांनी हे निर्देश दिले.
कोल्हापूर जिल्ह्यातल्या शिरोळ तालुक्यातल्या क्षारपड जमिनींच्या सुधारणेसंदर्भातही त्यांनी आज मंत्रालयात बैठक घेतली. याबाबत सविस्तर प्रस्ताव तयार करून तो शासन मान्यतेसाठी तातडीनं पाठवावा, त्याला प्रशासकीय मान्यतेसह आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. या बैठकीत अजीत पवार यांनी कोल्हापूर जिल्ह्यातलं पर्जन्यमान, नद्यांची पाणी पातळी, धरणांमधला पाणीसाठा याबाबतचा आढावा कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून घेतला.