तीन नव्या गुन्हेगारी कायद्यांच्या अंमलबजावणीमुळे देशात न्यायदानाचं एक नवीन पर्व सुरू झालं आहे, असं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं आहे. राष्ट्रपतींच्या हस्ते काल नवी दिल्लीत दोन दिवसांच्या राज्यपाल परिषदेचं उद्घाटन झालं, त्यावेळी त्या बोलत होत्या. समृद्ध लोकशाहीसाठी केंद्र सरकारच्या विविध यंत्रणांनी सर्व राज्यांसमवेत समन्वयानं काम करणं गरजेचं आहे. हा समन्वय राखण्यासाठी आपण राज्यांचे प्रमुख म्हणून कशाप्रकारे सहाय्य करू शकतो यावर राज्यपालांनी विचार करावा असा सल्ला त्यांनी दिला. राष्ट्रीय शिक्षण धोरणात शिक्षण संस्थांची गुणवत्ता आणि मूल्यांकन पद्धतीत सुधारणा करण्यावर भर देण्यात आला आहे. राज्यातल्या विद्यापीठांचे कुलपती म्हणून या सुधारणा घडवून आणण्यात आपलं योगदान द्या असं आवाहन राष्ट्रपतींनी केलं.