राष्ट्रपतींच्या अभिभाषणाबद्दलच्या आभारप्रस्तावावरची चर्चा संसदेच्या दोन्ही सभागृहात पुढं सुरु झाली. देशाची अर्थव्यवस्था जगात पाचव्या क्रमांकावर असूनही देशात दरडोई उत्पन्न कमी असल्याबद्दल समाजवादी पार्टीचे अखिलेश यादव यांनी सवाल उपस्थित केला. स्पर्धा परीक्षांचे पेपर फुटल्याच्या प्रकरणाचा उल्लेख करुन त्यांनी आरोप केला की या सरकारला युवकांना रोजगार द्यायचाच नाहीये.
काँग्रेसने भूतकाळात आपल्या मित्रपक्षांना नेस्तनाबूत केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे यांनी आपल्या भाषणात केला. राष्ट्रउभारणीच्या कामात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारला महाराष्ट्रातलं महायुती सरकार पाठिंबा देईल, असं ते म्हणाले.
राज्यसभेत तृणमूल काँग्रेसचे कल्याण बॅनर्जी यांनी, रालोआ सरकार राज्यांचे अधिकार काढून घेत असल्याबद्दल टीका केली. लोकसभा निवडणुकीत संविधानाविषयी चुकीचं कथानक पसरवण्यात आलं असं भाजपाचे अशोक चव्हाण यांनी सांगितलं. नीट परीक्षेतल्या घोटाळ्याची चौकशी करुन दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी त्यांनी केली.