देशभरात आज दिवाळीचा सण आनंद आणि उत्साहात साजरा केला जात आहे. घरोघरी पणत्या लावून, आकाशकंदिल लावून आणि रोषणाई करून प्रकाशाचा हा सण साजरा केला जात आहे. दिवाळीच्या निमित्तानं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
दिवाळीचा सण हा आनंद आणि उत्साहाचा सण असून तो अज्ञानावर ज्ञानाच्या आणि वाईटावर चांगल्याच्या विजयाचं प्रतीक आहे असं राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांनी समाजमाध्यमांवरच्या संदेशात म्हटलं आहे. हा सण म्हणजे गरीब आणि गरजूंना मदत करण्याची आणि आपला आनंद त्यांच्याबरोबर वाटून घेण्याचीही संधी आहे, असंही मत त्यांनी व्यक्त केलं आहे. नागरिकांनी प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करावी आणि आरोग्यदायी, संपन्न आणि जबाबदार समाज घडवण्याची शपथ घ्यावी असं आवाहनही त्यांनी केलं आहे.
दिवाळीचा सण फक्त भारतात नव्हे तर जगभरातल्या भारतीयांकडून आनंद आणि उत्साहात साजरा केला जातो, असं उपराष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. दिवाळीच्या सणाच्या प्रकाशानं देशाला एकात्मता, संपन्नता आणि अमर्यादित प्रगतीचा मार्ग दाखवावा अशा सदिच्छा त्यांनी व्यक्त केल्या आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही समाजमाध्यमांवरून शुभेच्छा दिल्या आहेत. प्रकाशाच्या या सणाच्या निमित्तानं सगळ्यांना आरोग्यदायी, आनंदी आणि संपन्न आयुष्य लाभावं अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या आहेत.
महाराष्ट्रात नरकचतुर्दशीनिमित्त आज घरोघरी प्रथेनुसार पहाटे चंद्रोदयापूर्वी अभ्यंगस्नान करुन सर्वांनी दीपावलीचा आनंद लुटला. मुंबई, ठाणे, डोंबिवली, कल्याण आणि इतर विविध शहरांमधे उंची वेशभूषा करुन तरुणाई या निमित्ताने एकत्र जमून एकमेकांना शुभेच्छा देत हा सण साजरा करते. दिवाळी पहाटेनिमित्त ठिकठिकाणी संगीत, नृत्य आणि इतर सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. ठिकठिकाणी रांगोळ्यांनी अंगणं, आवारं, आणि रस्ते सजले आहेत. घरोघरी विविध आकारांचे आकाशकंदिल आणि विजेच्या दिव्यांची रोषणाई करण्यात आली आहे. मुंबई शहरातल्या जागतिक वारसा सांगणाऱ्या इमारतींवरही दिवाळीनिमित्त विविध रंगी दिव्यांची आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे.