टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत, गतविजेत्या इंग्लंडचा पराभव करुन भारतीय संघानं तिसऱ्यांदा अंतिम सामन्यात धडक मारली आहे. पावसामुळे नाणेफेकीला उशीर झाल्यानंतर इंग्लंडनं नाणेफेक जिंकून भारताला फलंदाजीसाठी आमंत्रित केलं. फलंदाजीसाठी प्रतिकूल खेळपट्टीवर भारतीय संघानं पहिले दोन गडी झटपट गमावले, त्यानंतर पावसाने हजेरी लावली.
खेळ पुन्हा सुरू झाल्यानंतर रोहित शर्माच्या ५७ आणि सूर्यकुमार यादवच्या ४७ धावांच्या जोरावर भारतीय संघाने १७१ धावांपर्यंत मजल मारली. त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी चोख कामगिरी बजावत इंग्लंडला सोळा षटक ४ चेंडूत १०३ धावातच गारद केले. भारताच्या अक्षर पटेल, कुलदीप यादव या दोघांनी प्रत्येकी तीन फलंदाज मोक्याच्या क्षणी बाद करत तंबूत पाठवले. जसप्रित बुमराह ने दोन गडी बाद केले. गोलंदाज अक्षर पटेल ला सामनावीर घोषित कऱण्यात आलं. अंतिम सामना भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान रंगणार आहे.