गडचिरोली जिल्ह्यातल्या नक्षल चळवळीतील राजकीय आणि लष्करी हालचालींचा प्रभारी आणि वरिष्ठ नक्षल नेता नांगसू मनकू तुमरेटी उर्फ गिरीधर उर्फ बिच्चू यानं पत्नी संगीतासह ; गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत काल शरणागती पत्करली. गिरीधरवर १७९ गुन्ह्यांची नोंद आहे. त्यात ८६ चकमकी आणि १५ जाळपोळीच्या गुन्ह्यांचा समावेश आहे. महाराष्ट्र शासनान त्याला पकडण्यासाठी २५ लाख रुपये बक्षीस जाहीर केलं होतं. नक्षलवाद्यांचा संविधानावर विश्वास नाही. ते हिंसेवर विश्वास ठेवून निरपराध नागरिकांचा बळी घेतात. त्यामुळे आमचा त्यांना विरोध आहे. पोलिसांनी सोशल पोलिसींगद्वारे शासकीय योजनांचा लाभ मिळवून दिल्यानं दुर्गम भागातील आदिवासींना नक्षल्यांपेक्षा पोलिस जवळचे वाटतात. म्हणून शरण येणाऱ्यांची संख्या वाढत आहे. गिरीधर हा मोठा नक्षल नेता मुख्य प्रवाहात आल्यानं नक्षल चळवळ जवळपास संपली आहे, असं फडणवीस म्हणाले. विविध चकमकींमध्ये धाडसी कामगिरी केल्याबद्दल अहेरीचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक यतीश देशमुख, सी-६० पथकाचे कमांडर वासुदेव मडावी, समय्या आसम यांचा याप्रसंगी फडणवीस यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
Site Admin | June 23, 2024 12:59 PM | गडचिरोली | नांगसू मनकू तुमरेटी