गडचिरोली जिल्ह्यात जोरदार पावसामुळे आज जनजीवन विस्कळीत झालं. पुरामुळे गडचिरोली-चार्मोशी आणि आलापल्ली-भामरागड या मार्गांसह जिल्ह्यातल्या चाळीस मार्गांवरची वाहतूक ठप्प झाली. धानोरा तालुक्यात गेल्या चोवीस तासांत सर्वाधिक १५४ पूर्णांक २ दशांश मिलिमीटर पावसांची नोंद झाली. गडचिरोली जिल्ह्यात आतापर्यंत १६२ पूर्णांक ९ दशांश टक्के पाऊस झाल्याचं वेधशाळेनं कळवलं आहे. हेमलकसा – भामरागड दरम्यान आलेल्या पुरात अडकलेल्या ३५ नागरिक आणि तीन मुलांना काल एसडीआरएफ आणि महसूल विभागाच्या पथकानं सुखरूप बाहेर काढलं.
तसंच गडचिरोली जिल्ह्यातल्या रानमूल इथंही दोन व्यक्तींचे प्राण वाचवण्यात यश आलं. दरम्यान गोसेखुर्द धरणातून आज अडीच लाख क्युमेक्स इतका विसर्ग करण्यात आला. त्यामुळे गडचिरोली-नागपूर मार्ग बंद होण्याची शक्यता असल्याचं सांगण्यात आलं.
भंडारा जिल्ह्यात काल रात्रीपासून पडणाऱ्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. वैनगंगा नदी दुथडी भरून वाहत असून गोसेखुर्द धरणाचे २७ दरवाजे उघडले आहेत. लाखनी तालुक्यात अनेकांच्या घरात पावसाचं पाणी शिरून जनजीवन विस्कळीत झालं आहे.
नांदेड इथल्या विष्णुपूरी प्रकल्पाचा १ दरवाजा उघडला असून प्रकल्पातून १५ हजार २९७ क्युसेक्स पाणी गोदावरी नदीत सोडण्यात आलं आहे.