इस्रायलने लेबननमध्ये केलेल्या हवाई हल्ल्यात सहाशे पेक्षा जास्त जण ठार झाले आहेत. हिजबुल्लाहने इस्रालवर क्षेपणास्त्राचा मारा करत या हल्ल्याला प्रत्युत्तर दिलं आहे. अमेरिका, फ्रान्स आणि मित्र राष्ट्रांनी इस्रायल-लेबनन सीमेवर २१ दिवसांचा युद्धविराम घ्यावा, अशी मागणी केली आहे. अमेरिका, फ्रान्ससह युरोपियन युनियन, जर्मनी, सौदी अरेबिया, कतर आणि संयुक्त अरब अमिराती यांनी हे निवेदन केलं आहे. तर इस्रायलचे राष्ट्राध्यक्ष बेंजामीन नेत्यानाहू यांच्या कार्यालयानं इस्रायल संरक्षण दलाला अधिक जोमाने लढण्याचे निर्देश दिले आहेत.
दरम्यान, हिजबोल्लाह आणि इस्रायल संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारतीयांनी लेबननमध्ये प्रवास न करण्याचं आवाहन बैरुतमधल्या भारतीय दुतावासानं केलं आहे. पश्चिम आशियाई देशात प्रवास करू नये आणि लेबनन तात्काळ सोडावं असंही भारतीय दुतावासानं म्हटलं आहे. ज्यांना तिथं राहणं आवश्यक आहे त्यांनी आवश्यकता नसेल तर बाहेर पडू नये असंही दुतावासाने म्हटलं आहे.