आषाढी एकादशी उद्या साजरी होत आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पंढरपूर दौऱ्यावर असून, त्यांच्या हस्ते आज उत्तररात्री अडीचच्या सुमाराला श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा केली जाणार आहे.
यानिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांना आवश्यक त्या सर्व सुविधा आणि व्यवस्था उपलब्ध करून देण्यासाठी सोलापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली “समन्वय समिती” गठीत करण्यात आली आहे. ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, तसंच सार्वजनिक आरोग्य मंत्री तानाजी सावंत या समितीत सदस्य म्हणून काम पाहणार आहेत.
आषाढीवारी निमित्त राज्यातील अनेक मंत्री उपस्थित राहणार आहेत. यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय कुटुंब आणि आरोग्य कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव, महसुल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, विधान परिषदेच्या उपाध्यक्ष नीलम गोऱ्हे, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह अनेक मंत्री आणि मंत्रालयातले प्रमुख अधिकारी यात्रेसाठी पंढरपूरात दाखल झाले आहेत.
आषाढी वारीसाठी आज मुंबईतल्या छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्थानकातून भाजपाच्या वतीनं नमो एक्स्प्रेस ही गाडी भाविकांना घेऊन पंढरपूरला रवाना झाली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी या गाडीला झेंडा दाखवला.