माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर शंभर कोटी वसुली प्रकरणात न्यायालयाच्या आदेशानंतर गुन्हा दाखल झाला होता, तेव्हा महाविकास आघाडीचं सरकार सत्तेवर होतं, असं सांगत आपण कधीही द्वेषभावनेनं राजकारण करत नसल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी स्पष्ट केलं. ते आज मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते.
देशमुख गृहमंत्री असताना विरोधी पक्षात असणाऱ्या गिरीश महाजन यांच्यावर मोक्का लावण्यासाठी देशमुख यांनी कसा दबाव आणला होता त्याचे ऑडिओ पुरावे आपण दिले असून या संदर्भात सीबीआयने न्यायालयात आरोपपत्र दाखल केलं आहे, असं फडनवीस यांनी सांगितलं.
मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांच्यावरचे गुन्हे २०१३ सालचे असून यापूर्वीही त्यांच्या नावाचं वॉरंट निघाल्याचं फडनवीस यांनी सांगत जरांगे यांनी केलेले आरोप फेटाळून लावले. न्यायालयात तारखेला हजर राहिलं नाही तर न्यायालय वॉरंट काढतं, हा प्रक्रियेचा भाग असल्याचं ते म्हणाले.