अमेरिकन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेला काल रात्रीपासून प्रारंभ झाला. पॅरिस ऑलिम्पिकला आता जेमतेम एक महिना राहिला असल्यानं जगातील अनेक अव्वल खेळाडूंनी स्पर्धेकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे यंदाच्या या स्पर्धेत चुरस उरलेली नाही.
आज सकाळी झालेल्या स्पर्धेच्या पुरुष दुहेरीत सामन्यात कृष्ण प्रसाद गरागा आणि साई प्रतीक के या भारतीय बॅडमिंटनपटूंच्या जोडीनं स्कॉट गिल्डेआ आणि पॉल रेनॉल्ड्स या आयरिश जोडीचा 21-14, 21-12 असा पराभव केला. महिला दुहेरीत त्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद यांची आज दुपारी चिनी तैपेईच्या प्रतिस्पर्ध्यांशी गाठ पडणार आहे.
पुरुष एकेरीत काल रात्री झालेल्या सामन्यात कार्तिकेय गुलशन कुमार याला चिनी तैपेईच्या जे लियाओ याच्याकडून हार पत्करावी लागली, त्यामुळं तो उपान्त्यपूर्व फेरीत पोहोचू शकला नाही. भारताचे पीव्ही सिंधू, एचएस प्रणॉय, लक्ष्य सेन, सात्विकसाईराज रांकीरेड्डी, चिराग शेट्टी इत्यादी बॅडमिंटपटू या स्पर्धेत उतरलेले नाहीत.